top of page
Support to Quit.jpg

प्रिय मित्रांनो, जर तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुम्ही आधीच अर्धी लढाई जिंकली आहे. व्यसनांतून मुक्त होण्यासाठी बरीच मदत उपलब्ध आहे. पुढील पर्याय तुम्हाला नक्कीच मदतीचे ठरतील:

१) मानसोपचारतज्ज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ

ते तुमचे ऐकतील, तुमच्या समस्या समजून घेतील आणि व्यसन सोडण्यासाठी प्लॅन तयार करण्यात मदत करतील. जर तुम्ही काही तणावाचा सामना करत असाल तर ते तुम्हाला त्यावर मात करण्यातही मदत करतील. मानसोपचारतज्ज्ञ तुम्हाला अशी औषधे देखील देऊ शकतात ज्यामुळे दारू सोडल्यावर होणार त्रास कमी होईल. विशेषत: जर तुम्हाला दारू सोडल्यानंतर खूप जास्त शारीरिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असेल तर काही दिवस औषधांचा आधार घेणे चांगले.

तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार विभागात गेल्यास उपचार मोफत किंवा अगदी कमी खर्चात होतील.

2) अल्कोहोलिक अनॉनिमस

अल्कोहोलिक्स अनॉनिमस हा एक विनामूल्य मदत करणारा स्वयं-सहाय्यता गट आहे. जिथे लोक दारूपासून दूर राहण्यासाठी एकमेकांना मदत करतात. बऱ्याच वर्षांपासून दारू सोडलेले लोक इतरांना दारू सोडण्यास मार्गदर्शन करतात. बरेच लोक त्यांच्या सभांना नियमित उपस्थित राहून दारू सोडण्यात यशस्वी झाले आहेत. हे गट जवळपास सर्वच शहरांमध्ये आहेत. त्यांच्या सभेला दारूचे व्यसन असलेले लोक किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यच उपस्थित राहू शकतात. त्यामुळे तुमची ओळख गोपनीय राहते. दारूचे व्यसन असलेल्या व्यक्तीला यायचे नसले तरी कुटुंबातील इतर सदस्य मार्गदर्शन आणि समर्थनासाठी बैठकीला उपस्थित राहू शकतात.


तुम्ही तुमच्या जवळच्या गटाची माहिती अल्कोहोलिक्स अनॉनिमस या वेबसाइटवर शोधू शकता किंवा 8097055134 या क्रमांकावर कॉल करून विचारू शकता.

3) तुमच्या स्मार्टफोनमधील अँप्स

अँपच्या तंत्रज्ञानामुळे दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्यांना कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही ठिकाणी उच्च-गुणवत्तेची मदत देता येणे शक्य झाले आहे. अ‍ॅप्स अनेक फायदे देतात जसे की, तुमच्या जेंव्हा मनात येईल तेंव्हा तुम्ही वापरू शकता, तुम्‍हाला दारू सोडणाऱ्या इतर लोकांचा पाठिंबा मिळतो, तुम्‍ही तुमच्‍या प्रगतीचा आलेख पाहू शकता, तुम्‍हाला प्रेरित ठेवण्‍यासाठी अँप स्वयंचलित संदेश पाठवत राहतात, इ.

​बरेच अँप्स लोकांना दारू सोडण्यासाठी मदत करतात, जे तुम्ही Google Play Store वरून डाउनलोड करू शकता. तुम्ही ते वापरून तुमच्यासाठी कोणते अँप अनुकूल आहे हे पाहू शकता. तुम्ही 'Try Dry' अँप देखील पाहू शकता. ड्राय जानेवारी मोहिमेचे हे विनामूल्य अँप आहे जे एखाद्या व्यक्तीला वर्षातील कोणत्याही वेळी 1 महिना दारूमुक्त राहण्याचे आव्हान स्वीकारण्यास मदत करते.

4) हेल्पलाईन

तुम्हाला तुमच्या घरातूनच एखाद्याशी बोलून मदत घ्यायची असेल तर तुम्ही हेल्पलाइनचा आधार घेऊ शकता. तुम्हाला गंभीर अवलंबित्व असल्यास, हेल्पलाइनवर न जाता मानसिक आरोग्य उपचार व्यावसायिक किंवा व्यसनमुक्ती केंद्राकडून मदत घेण्याची शिफारस करतो.

पुढे काही हेल्पलाइन क्रमांक आहेत:

5) व्यसनमुक्ती केंद्रे

​वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार विभागाकडे विथड्रॉल मॅनेजमेंट (डिटॉक्सिफिकेशन) मदतीसाठी जाऊ शकता. NIMHANS - बंगळुरू, नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटर (AIIMS) - गाझियाबाद, इत्यादी सारख्या अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये देखील दीर्घकालीन व्यसन उपचार कार्यक्रम राबवले जातात.

वैद्यकीय महाविद्यालयांव्यतिरिक्त, भारत भरातील काही चांगल्या आणि प्रतिष्टीत अशा व्यसनमुक्ती केंद्रांची यादी आम्ही बनवली आहे.

 

ही यादी पाहण्यासाठी इथे क्लीक करा. इथे तुम्हाला या सर्व केंद्रांचे संपर्क क्रमांक मिळतील.

Rehabs.in या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळील व्यसनमुक्ती केंद्रांची माहिती मिळू शकेल.

6) संपर्क

तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास मोकळ्या मनाने आम्हाला 8149363854 वर कॉल करा किंवा आम्हाला ईमेल करा  poisonswelove@gmail.com.

bottom of page