दारूची तल्लफ अथवा पिण्याची तीव्र इच्छा ही एखाद्या लाटेसारखी असते. जेवढ्या तीव्रतेने ती येते तेवढ्याच तीव्रतेने कमीदेखील होते. या तीव्रतेला काही मिनिटांसाठी नियंत्रित करण्याची गरज असते. काही महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्यास दारूचे व्यसन सुटण्यास मदत होते.
1) समवयस्कांचा अथवा मित्रांचा दबाव हे दारूच्या आहारी जाण्याचे महत्वाचे कारण ठरते | दारू पिण्यासाठी कुणी तुमच्यावर दबाव टाकत असल्यास त्याला धैर्याने व हिमतीने नकार द्या | त्याला कशा प्रकारे तुम्ही नाही म्हणू शकाल याचा विचार करा | आपल्या मित्रांनाही यासाठी प्रेरित करून हे विषरूपी व्यसन सोडविण्यास एकमेकांना मदत करा | एकमेकांच्या सहकार्याने व्यसन सोडणे सोपे असते |
2) दारू सोडणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण... (यात तुम्हाला वाटते ते महत्वाचे कारण लिहा) अशी एक चिट्ठी आठवणीसाठी (Reminder Note) तुमच्या खिशात ठेवा | जेव्हाही दारूची तल्लफ येईल ही चिट्ठी वाचा | मनाला सतत मद्यपानामुळे होणार्या दुष्परिणामांची आठवण करून दिल्यास तल्लफ कमी होते |
3) तल्लफ येताच एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला फोन करून त्याच्याशी बोला | या बोलण्यातून नवे विचार मनात येण्यास मदत होते |
4) ज्यामुळे दारू पिण्याची इच्छा बळावते अशा गोष्टी व प्रसंगांची यादी बनवा | अशा बाबी टाळा तसेच अशा प्रसंगांचा कशा प्रकारे सामना करता येईल याची आखणी करा |
5) दारूची तल्लफ आल्यावर त्यापासून मनाला दहा मिनिटांसाठी परावृत्त करता येईल अशा गोष्टींचा विचार करा | जसे यू ट्यूब वर तुमच्या आवडीचा कॉमेडी शो अथवा आवडत्या डान्स चा भाग पाहणे, आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेणे, मित्रांशी गप्पा मारणे, पाच मिनिटे दीर्घ श्वास/प्राणायाम करणे, ध्यानधारणेबाबत केलेले मार्गदर्शन ऐकणे, अंघोळ करणे, स्वतःच्या मुलाशी खेळणे, आवडणारे पुस्तक वाचणे इ.
6) नियमित व्यायाम करा, व्यवस्थित झोप घ्या आणि वेळापत्रक आखून त्यानुसारच संतुलित आहार घ्या | तुम्ही थकलेले असाल किंवा भूक लागली असेल तर अशा वेळी दारू पिण्याची तल्लफ येऊ शकते | अशा वेळी एक पेला गार पाणी पिल्यास ही तीव्रता नष्ट होण्यास मदत होते | खूप जास्त (त्रास होईल असे) काम करू नका | निरोगी मार्गाने जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी दररोज किमान स्वतःसाठी एक तास तरी काढा |
7) जीवन आनंदी करण्यासाठी चांगले मार्ग शोधा | खेळ, संगीत, रंगकाम, निसर्गभ्रमंती, ध्यानधारणा असे नवीन छंद जोपासा | किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेसोबत तुम्हाला आवडेल अशा कामाची सुरुवात करा | नवी मैत्री आणि नावीन्यपूर्ण जीवनशैली माणसातील बदल टिकवून ठेवण्यास मदत करते | जेव्हा तुम्ही विधायक उपक्रमांद्वारे जीवनाचा आनंद घ्यायला सुरुवात कराल तेव्हा तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण होईल आणि ही बाब तुमचे जीवन अधिक आनंदी करेल |
8) आसपासच्या युवांसोबत तुमचे अनुभव शेअर करून त्यांना दारूच्या व्यसनापासून तुम्ही परावृत्त करू शकता | या प्रक्रियेत तुमचा स्वतःचा संकल्प अधिक बळकट होईल |
9) मनसोपचारतज्ञ/व्यसनमुक्ती केंद्र यांची मदत घेतल्यास ध्येय साध्य होण्याची शक्यता वाढते | अशी काही औषधी आहेत जी तल्लफ आणि नशेच्या गर्तेत जाण्याची लक्षणे कमी करू शकतात | आपण अल्कोहोलिक एनोनिमस (Alcoholic Anonymous) च्या बैठकीला उपस्थित राहू शकता | AA हा एक असा स्वयं सहायता समूह आहे जेथे स्वतः दारू सोडलेले लोक दुसर्यांचे व्यसन सोडविण्यास मदत करतात | या समुहाचा एक भाग असल्याने शांतचित्त राहण्यास मदत होते | जवळ जवळ सर्वच शहरांमध्ये त्यांची केंद्र आहेत | http://www.aagsoindia.org/ या संकेतस्थळावर तुम्ही जवळचे केंद्र शोधू शकता | अथवा 8097055134 या क्रमांकावर संपर्क करू शकता |
पुढच्या वेळी तल्लफ आल्यावर तुम्ही नेमके काय करणार आहात हे ठरवणे खूप आवश्यक आहे | अशा क्षणी काय कृती करावी हे ठरवण्यास यामुळे मदत होते | या प्रयत्नात सुरुवातीला तुम्ही अपयशी ठरलात तरी हार मानू नका | आपण पुन्हा कशामुळे व्यसनाच्या आहारी गेलो याचे विश्लेषण करून प्रयत्न करीत राहिल्यास तुम्ही लवकरच यशस्वी व्हाल |
Comments