प्रिय मित्रांनो,
आपल्या मित्र-मैत्रिणींमुळे आपल्यावर नकळत येणार दबाव नक्कीच खूप जास्त असतो. परंतु काळजी करू नका, पुढील चार कलमी कार्यक्रम अंमलात आणून तुम्ही या दबावावर सहज मत करू शकता!
A) न घाबरता स्पष्ट “नाही” म्हणणे
B) स्वतःच्या आरोग्यदायी (दारू न पिण्याच्या) निवडीबाबत गर्व बाळगणे
C) मैत्री गमावणे किंवा वरिष्ठ अपमानित होतील, ही भीती न बाळगणे
D) चांगल्या मित्र-मैत्रिणींच्या (दारू न पिणाऱ्या) सहवासात राहणे
चला तर मग ह्या प्रमुख चार बाबी आपण थोड्या खोलात जाऊन समजावून घेऊ, म्हणजे त्या अमलात आणायला सोप्या जातील.
A) न घाबरता स्पष्ट “नाही” म्हणणे
1) तुमचे वागणे संकुचित असेल व तुम्ही ठाम दिसत नसाल तर तुमचे सहकारी तुमच्यावर अगदी सहजपणे दबाव टाकू शकतील. म्हणूनच स्वतःला आत्मविश्वासू व ठाम दर्शवणे खूपच महत्वाचे आहे. त्यासाठी डोळ्यात डोळे घालून ठळकपणे आणि निर्भीडपणे “नाही” म्हणा. जसे की “माफ करा, पण मी दारू घेत नाही!”
2) कोणी दारू पिण्यासाठी विचारल्यावर त्याला काय उत्तर द्यायचे याची आधीच तयारी करून ठेव. तुम्ही पूर्वीपासून नाही म्हणण्याची तयारी केलेली असेल, म्हणून तुम्हाला वेळेवर ठामपणे नाही म्हणणे सोपे जाईल.
3) कधीकधी लोक इतरांवर दबाव आणण्यासाठी फुटकळ युक्तिवाद करतात. जसे की “जर तुम्ही मद्यपान केले नाही तर आयुष्यात काहीच मिळावलेले नाही” किंवा “माणसाने आयुष्यात एकदा तरी सर्व काही करून पाहिले पाहिजे!” वगैरे वगैरे... असे असंख्य युक्तिवाद ते करतील, पण त्यांच्या बालिश युक्तिवादाला प्रत्युत्तर देण्याची अजिबात गरज नाही हे समजून घ्या. तुम्ही फक्त तुमची भूमिका थोडक्यात सांगत रहा. हे लक्षात ठेवा की त्यांना काही पटवून देण्याची अजिबात गरज नाही कारण तुमचा निर्णय हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही घेतलेला आहे. त्यांना स्वतःलाही माहीत असते की त्यांची स्वतःची निवडही आरोग्यास घातकच आहे पण त्यांना ते मान्य करायचे नसते. म्हणूनच तुम्ही त्यांना तुमच्या निर्णयाविषयी कितीही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचे मन बदलणार नाही. आपण इथे एक उदाहरण घेऊन बघूया की अशा प्रकारचा संवाद आपल्याला कसा हाताळता येईल:
मित्र: दारू घेशील का रे ?
तुम्ही: नाही, धन्यवाद! मी दारूला कधीही स्पर्श न करण्याचे ठरवले आहे.
मित्र: एखाद्यावेळी घेतली तर काही होत नाही रे.
तुम्ही: दारू नशेचा पदार्थ आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होताना मी पाहिली आहेत. माझं माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. त्यामुळे, मी दारूला कधीच हात लावणार नाही.
मित्र: माझं माझ्या कुटुंबावर प्रेम नाहीये असं तुला म्हणायचं आहे का ?
मी: नाही रे तु तुझ्या कुटुंबावर नक्कीच प्रेम करतोस. दारूमुळे अनेक कुटुंबांचं नुकसान होताना मी पाहिलेलं आहे. त्यामुळे मी अजिबात दारू पिणार नाही.
मित्र: प्रत्येक गोष्टीचा एकदातरी अनुभव घेतला पाहिजे, मित्रा.
मी: दारू एकदा घेतल्यानंतर ती परत घ्यायची का नाही यावर आपलं स्वतःच नियंत्रण राहत नाही, मित्रा.
मित्र: उगाच घाबरट सारखी काहीतरी कारणे सांगत आहेस. पळकुटेपणा करत आहेस.
मी: तुला जे समजायचं आहे ते समज पण मी दारू पिणार नाही म्हणजे नाही.
4) वारंवार नकार देऊनही ते सतत दबाव टाकत असतील तर ते ठिकाण सोडुन निघून जाणे चांगले. तुम्ही असे म्हणू शकता की जर ते तुमच्या मताचा आदर करू शकत नसतील तर तुम्हाला त्यांच्या पार्टीमध्ये थांबण्याची इच्छा नाही.
B) स्वतःच्या आरोग्यदायी (दारू न पिण्याच्या) निवडीबाबत गर्व बाळगणे
1) कधीकधी तुमचे मित्र तुम्हाला पित नसल्यामुळे कमी लेखू शकतात. जर तुम्ही त्यांचा दृष्टिकोन स्वीकारला आणि लाज वाटून घेतली तर लवकरच तुम्ही त्यांच्या दबावाला बळी पडाल. एका गोष्टीबाबत तुम्ही स्पष्ट असले पाहिजे की केवळ आपले बरेच मित्र मद्यपान करतात म्हणून तो गोष्ट करण्यासाठी खूप छान आहे असे होत नाही. मद्यपान हे युवांमधील मृत्यू आणि अपांगत्वासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांपैकी सर्वात मोठा घटक आहे. त्यामुळे ते न घेणेच शहाणपणाचे आहे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या योग्य निर्णयाबद्दल अभिमान वाटला पाहिजे.
2) हे ध्यानात ठेवा की मद्यपान करणे हे आपल्या मित्रमंडळात खूप सामान्य असले तरी सध्या जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या (५७% किंवा ३.१ अब्ज लोक) हे व्यसनरूपी विष न घेण्याचे निवडतात.
3) होय, हे खरे आहे की बरेच यशस्वी लोक देखील मद्यपान करतात आणि म्हणूनच, मद्यपान अनेक यशस्वी लोकांच्या अधोगतीचे किंवा मृत्यूचे कारण बनते.
C) मैत्री तुटेल किंवा वरिष्ठ अपमानित होतील, ही भीती न बाळगणे
1) तुम्ही तुमच्या मित्रांना स्पष्ट करू शकता की दारूला नाही म्हटल्यामुळे, तुम्ही त्यांची मैत्री नाकारत नाही. तुम्ही फक्त दारू घेण्यास नकार देत आहात. तुम्ही खात्री देऊ शकता की त्यांचा सहवास तुम्ही एंजॉय करता, तसेच रिलॅक्स होण्यासाठी किंवा एंजॉयमेंट साठी अजून वेगळे पर्यायी मार्ग सुचवू शकता. जसे की:
मद्यपान न करता एकत्र डान्स पार्टी करणे किंवा नुसती गाणी म्हणून एंजॉय करणे.
एकत्र खेळ खेळणे.
एखाद्या चित्रपटास जाणे, नैसर्गिक सौंदर्याच्या ठिकाणी फिरायला जाणे.
सर्वांना आवडणारे नवीन काहीतरी खाणे किंवा पिणे.
2) जर तुम्ही मद्यपान करत नाही म्हणून काही लोकांना तुमच्याशी मैत्री करायची नसेल तर तसेच असू दे. होय, आपल्या सर्वांनाच मित्रांची गरज असते. पण चांगले मित्र तुमच्या योग्य निवडीचा आदर करतात आणि तुमच्या आरोग्यदायी सवयींसाठी सहकार्य करतात. जर कोणी तुमच्यावर काहीतरी हानिकारक करण्यासाठी दबाव टाकत असेल, तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात असणे खरोखर फायदेशीर आहे का? आपली पृथ्वी अगणित माणसांनी भरलेली आहे. जर आपण योग्य बाबी निवडल्या तर लवकरच आपण योग्य प्रकारचे मित्र आकर्षित करू जे आपल्याला समृद्ध होण्यास आणि खरोखर आनंदी होण्यास मदत करतील.
3) जर तुमच्यावर दबाव आणणारी व्यक्ती कामावर तुमची वरिष्ठ असेल किंवा इतर अशी व्यक्ती असेल जिच्याशी ठाम राहणे कठीण आहे, तर तुम्ही असे काही कारण देऊ शकता की ज्यामुळे ते तुमच्याशी वाद घालू शकणार नाही. उदा. तुम्ही तुमच्या आईला किंवा मुलाला वचन दिले आहे, तुम्ही देवापुढे अशी प्रतिज्ञा केली आहे की पुन्हा मद्यपान करणार नाही, किंवा तुमच्या धर्मात याला परवानगी नाही वगैरे वगैरे...
4) इतरांना पिण्यासाठी दबाव आणणारे बहुतेक चांगल्या मनाचे लोक दुसऱ्या दिवशी सकाळी अशा लोकांचे कौतुक करतात जे त्यांच्या आग्रहाला बळी पडत नाहीत. खरंतर ते आपल्याकडे खूप चांगली इच्छाशक्ती असल्याचे सांगतात. आपण एका विषरूपी व्यसनाचा विरोध केला याचा एक समजूतदार माणूस कधीही राग ठेवणार नाही.
D) चांगल्या मित्र-मैत्रिणींच्या (दारू न पिणाऱ्या) सहवासात राहणे
1) दारू आणि तंबाखू सेवनासाठी सहकार्यांचा दबाव खूप जास्त असतो कारण जे लोक ते घेतात त्यांना ही अभिमानाची गोष्ट वाटते आणि म्हणून इतरांना ते घेण्यासाठी प्रवृत्त करतात. परंतु जे लोक ह्या गोष्टी घेत नाहीत ते या मुद्द्यावर नाही घेण्याच्या बाजूने बोलण्यापेक्षा शांत राहणे पसंत करतात, म्हणजेच एकदम गप्प राहतात. पण हे बरोबर नाही कारण ज्या लोकांना असे वाटते की व्यसनाधीन पदार्थ घेणे हानिकारक आहे त्यांनी आत्मविश्वासाने आपले विचार व्यक्त करणे आणि मित्रांना त्यांच्यापासून दूर राहण्याची शिफारस करणे आवश्यक आहे. असे केल्यानेच आपल्या मित्रमंडळात सकारात्मक दबाव निर्माण होऊन आपल्या मित्रांचे संरक्षण करण्यास मदत होईल.
2) असे बरेच लोक आहेत ज्यांना हे पदार्थ घ्यायचे नसतात पण जेव्हा सहकाऱ्यांचा दबाव जास्त असतो तेव्हा ते 'नाही' म्हणण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत. परंतु एका व्यक्तीने जरी हे धैर्य दाखवले तर हे लोक त्या व्यक्तीचे समर्थन करण्यास लगेच तयार होतात. याची तुलना थर्मामीटर आणि थर्मोस्टॅटशी केली जाऊ शकते. थर्मामीटर फक्त सभोवतालचे तापमान दर्शवितो, परंतु थर्मोस्टॅट परिसराला त्याने स्वतः ठरवलेलं तापमान घ्यायला लावतो. जर तुम्ही आत्मविश्वासाने थर्मोस्टॅट बनण्याचे ठरवले तर तुमच्याकडून 'नाही' म्हणण्याचे धैर्य मिळवण्याचा अनेकांना आनंद होईल…
3) आपल्या मित्रांसह खेळ, ट्रेक, डान्स, बुक क्लब, कराओके नाईट्स इत्यादीसारख्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे. जेव्हा तुमचे मित्र मंडळ वर सांगितल्यासारख्या आवडी विकसित करते, तेव्हा त्यांना आनंदी होण्यासाठी नशा करण्याची कल्पना आवडणार नाही.
4) आपले मित्र मंडळ हुशारीने निवडणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला व्यसनमुक्त जीवन जगायचे असेल तर निरोगी मार्गाने जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे माहीत असणारे किमान काही मित्र तुम्हाला असले पाहिजेत.
आपल्या आवडीचे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !!
Comments